कोणत्यानाकोणत्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये सदनिका खरेदी-विक्री, बक्षीसपत्र होतच असते. अशावेळी सदनिका खरेदीदाराला सभासद करून घेणे आवश्यक असते अशावेळी समितीने काय करावे याबाबत भाग हस्तांतरण या शेवटच्या भागात माहिती घेऊ.
भाग हस्तांतरणसाठी नियम
(१) एखाद्या सभासदास संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील आपले भाग व हितसंबंध यांचे हस्तांतरण करावयाचे असल्यास त्याने सदर हस्तांतरणाचा आपला इरादा असल्याबदल संस्थेच्या सचिवास, विहित नमून्यात १५ दिवसांची नोटीसा दिली पाहिजे व सदर नोटीशीसोबत ज्याचे नाव हस्तांतरण करावयाचे योजिले आहे त्याची हस्तांतरणास संमती असल्याबद्दलचे पत्र जोडले पाहिजे.
(२) बिंदू १ मध्ये उल्लेखित नोटीस मिळाल्यानंतर संस्थेचा सचिवाने अधिनिमातील कलम १५४बी(७) अनुसार सकृतदर्शनी सदर सभासद संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील आपले भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यास पात्र आहे किंवा कसे खात्री करावी आणि नोटिशीवर नमूद करून ती मिळाल्याच्या लगतनंतर भरणाऱ्या समितीच्या सभेपुढे ठेवली पाहिजे.
(३) बिंदू २ नुसार सभासद अपात्र असल्याचे सचिवाने नोटिसीवर नमूद केले असल्यास समितीने योग्य तो निर्णय घेऊन निर्णय घेतल्याचे तारखेपासून ८ दिवसाचे आत सभासदास तसे कळविण्यासंबंधी सचिवास निर्देश देऊन सचिवाने सभासदास कळवले पाहिजे.
(४) हस्तांतरकाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध याचे हस्तांतरीतीला हस्तांतरण करण्यासाठी संस्थेच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता नाही. मात्र हस्तांतरण झालेल्या व्यक्तीस अथवा हस्तांतरण करणाऱ्या व्यक्तीला आवश्यक भासल्यास तशा प्रकारचा लेखी अर्ज संस्थेकडे देण्यात यावा. संस्थेची समिती अर्जाच्या पात्रतेनुसार विचार करून योग्य तो निर्णय एक महिन्याच्ये आत घेणे आवश्यक.
५) संस्थेची संपूर्ण थकबाकी चुकती केल्याशिवाय सभासदत्व देता येत नाही.
६) सभासदत्व अर्जबाबत समितीने वा सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय, संस्थेस अर्ज मिळाल्यापासून ३ महिन्याच्या आत अर्जदारास न कळविल्यास अधिनियमातील कलम २२ (२) मधील तरतुदीनुसार सदर अर्ज स्वीकृत केला आहे, असे समजण्यात येते व ज्यांचे नाव हस्तांतरण करावयाचे आहे त्यास संस्थेचे सभासद करून घेण्यात आले आहे असे समजण्यात येते. मात्र त्यासाठी निबंधकांनी आदेशित करणे आवश्यक आहे.
७) अधिनियम, नियमावली किंवा उपविधी यातील तरतुदींचे उल्लंघन करून केलेले कोणतेही हस्तांतरण अवैध ठरते व असे हस्तांतरण संस्थेला बंधनकारक राहत नाही.
भाग हस्तांतरणासाठी कागदपत्र
प्रत्येक सदनिका खरेदीदाराने सदनिका खरेदी अथवा बक्षीसपत्र करताना संस्थेची थकबाकी नसल्याची खात्री करावी. तसेच खालील आवश्यक कागदपत्रांवर सदनिकामालकाच्या सह्या घेऊन ठेवाव्या.
१) संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील त्याचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज व सोबत भागपत्र सादर करणे.
२) नियोजित हस्तांतरीतीच्या सभासदत्वासाठी विहित नमुन्यात अर्ज
३) विहित नमुन्यामध्ये सदस्यांचे/ हस्तांतरकांचे राजीनामा पत्र
४) स्टॅम्प ड्युटी भरलेला नोंदणीकृत करारपत्र.
५) नियोजित हस्तांतरणासाठी संयुक्तिक कारण
६) हस्तांतरकाने संस्थेची सर्व देणी चुकती करणेबाबत हमीपत्र
७) हस्तांतरण शुल्क म्हणून, रुपये ५०० भरणा करणे.
८) नियोजित हस्तांतरीतिने रुपये १००/- प्रवेश शुल्क भरणे.
९) आपल्या सदनिकांच्या हस्तांतरणाबद्दल सर्वसाधारण सभेने ठरविलेल्या दराने अधिमूल्य भरणे. मात्र हे अधिमूल्य सहकार खाते आणि महाराष्ट्र राज्य शासन खालीलप्रमाणे जाहीर केले आहे, दिनांक ०९/०८/२००१ रोजी सहकार आयुक्तांनी जाहीर केल्यानुसार महानगर पालिका रुपये २५,०००/-, अ वर्ग नगर पालिका रु. २०,०००/-, अ वर्ग नगर पालिका रु. १५,०००/-, क वर्ग नगर पालिका रु. १०,०००/-, ग्रामपंचायत रु. ५०००/- या मर्यादेमध्येच असले पाहिजे आणि यापेक्षा जादा रक्कम देणगी अथवा वर्गणी इतर निधी अथवा इतर कोणत्याही स्वरुपातील / कारणांचा निधी या स्वरूपात हस्तांतराकांकडून अथवा हस्तांतरीतीकडून वसूल करता येणार नाही.
सूचना : हस्तांतरण अधिमूल्य हे सभासदाच्या कुंटुंबियामध्ये किंवा त्याने निर्देशित केलेल्या व्यक्तीसाठी अथवा मृत्यूनंतरचा कायदेशीर वारसाच्या नावे किंवा सभासदांमधील आपआपसातील बदलास लागू असत नाही.
१०) शासनाच्या किंवा पैसे पुरविणाऱ्या संस्थेच्या किंवा अन्य प्राधिकरणाच्या आदेशानुसार अगर मंजुरीनुसार लागणारा ‘ना हरकत’ दाखला.
११) हमीपत्र/प्रतिज्ञापत्र.
सभासदाच्या हितासाठी समितीने काम करावे. सभासदत्वस खुले असते. सभासदांना नाहक त्रास न देता सभासदत्व दिले गेले पाहिजे.
दुसरा भाग वाचला नाही का? आता ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पहिला भाग वाचला नाही का? आता ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
#WeRunSocieties