एकच कुटुंबातील समंजस बंधु भगिनी अथवा एकाच गटातील अनेक जमीन मालकांनी वादविवाद न करता जमिनीचे पोट हिस्से मोजणी करून घेणे सर्वाधिक सोपे आणि सुलभ आहे. बांध कोरून कोणी श्रीमंत होत नाही. स्वार्थीवृत्तीचा त्याग करून शांती आणि सुखाने जमिनीची मोजणी करून आयुष्याचा आनंद लुटावा.
अर्जदार यांनी पोटहिस्सा अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडावीत
१) पोटहिस्से करण्यासाठी सर्व सहधारकांच्या स्वाक्षरी असलेला अर्ज, जर एखाद्या सहधारकाची स्वाक्षरी नसेल तर संमतीने पोटहिस्सा करता येत नाही.
२) चालू ३ महिन्यातील गाव नमुना नं. ७/१२
३) धारण जमिनीमध्ये कसे पोटविभाग करावयाचे आहेत, ते दर्शविणारा सर्व सहधारकांच्या स्वाक्षरी असलेला कच्चा नकाशा. तसेच गाव नमुना नं. ७/१२ वेगळा झाला असल्यास गाव नमुना नंबर ६ ड मधील कच्चा नकाशा. नकाशा उपलब्ध नसल्यास तलाठी यांचेकडील प्रमाणपत्र जोडावे.
४) नकाशाप्रमाणे प्रत्येक भोगवटादार यांच्या कब्जेवहिवाटीत असलेले अंदाजित क्षेत्र व अधिकार अभिलेखामध्ये असलेल्या क्षेत्राचा तपशील द्यावा.
५) अर्जदार यांनी समाईक क्षेत्राचा उदा. विहिर, बोअरवेल, वस्ती, झाडे इत्यादीचा तपशील द्यावा. ६) संबंधित सर्वेनंबर / हिस्सा नंबर / गट नंबरची यापूर्वी हद्दकायम मोजणी करून घेतली असल्यास त्याचा मो.र.नं. व मोजणीचा दिनांक
७) भोगवटदार यांची ओळखपत्राची स्वसाक्षांकीत छायाप्रत. जसे आधारकार्ड, पॅन कार्ड, ओळख वाहन परवाना, पासपोर्ट वैगरे
८) साधी मोजणी फी भरुन घ्यावी.
वरील प्रमाणे सर्व पुर्ततेनिसी अर्ज प्राप्त झालेनंतर उपअधीक्षक भूमि अभिलेख अर्जदार व सहधारक यांना रितसर मुदतीच्या नोटीसीने कार्यालयात चौकशी कामी हजर राहण्यास कळवतात व खालीलप्रमाणे कार्यवाही करतात.
१) सर्व सहधारकांची त्यांचेकडील मुळ फोटो ओळखपत्राधारे खात्री केली जाते.
२) अर्जदारांनी दाखल केलेल्या कच्चा नकाशानुसार संबंधित सर्व्हे नंबर /गट नंबरचे अभिलेखाचा आधार घेऊन व अधिकार अभिलेखानुसार क्षेत्राचा मेळ घेऊन उपविभाग करून त्या नकाशावर व हिस्सा फॉर्म नंबर ४ (गुणाकार बुक) तयार करून त्यावर सर्व सहधारकांची स्वाक्षरी घेतली जाते.
३)अर्जदारांनी सादर केलेला नकाशा व क्षेत्राचा तपशील सर्व सहधारक मान्य असल्याबाबतचा जबाब तयार केला जातो व जबाब घेतेवेळी अधिकारी व सर्व सहधारकांचा एकत्रित फोटो मोबाईल काढला जातो. व जतन करून ठेवला जातो.
४) नंबर / हिस्सा नंबर/ गट नंबर च्या भूमापन अभिलेखानुसार असणाऱ्या मुळ क्षेत्रामध्ये कोणताही बदल न करता उपविभागाचे क्षेत्र कायम केले जातात.
५) दि. १६/०४/१९९३ रोजच्या परिपत्रकानुसार सर्व हिस्स्यांची प्रत्यक्ष जागेवर मोजणी करून नकाशा कायम केला जातो. त्यानंतर संबंधित हिस्सागंबर मध्ये उपविभाग करण्याची कार्यवाही केली जाते.
६) अभिलेख दुरूस्ती नोंदवहीमध्ये प्रकरणाची नोंद घेवून नियमानुसार हिस्सा फॉर्म नंबर ११ (आकारफोड पत्रक), हिस्सा फॉर्म नंबर १२ (फाळणीबारा) व दुरुस्ती गटबुक नकाशा तयार केला जातो.
७) त्यानंतर हिस्सा फॉर्म नंबर १२ व दुरुस्ती गटबुक नकाशा तहसिलदार यांच्याकडे गाव नमुना नंबर ७/१२ अद्ययावत करण्यासाठी पाठवला जातो.
८) अर्जदार यांना तयार केलेल्या उपविभाग नकाशाची क प्रत मोफत पुरविण्यात येते. इतर सहधारक यांना नक्कल फी वसुल करून पोटहिस्सा नकाशाची क’ प्रत पुरवली जाते. तसेच सर्व सहधारकांना हिस्सा फॉर्म नंबर ४ (गुणाकार बुक), हिस्सा फॉर्म नंबर ११ (आकारफोड पत्रक), हिस्सा फॉर्म नंबर १२ (फाळणीबारा) व जबाबाची प्रत विहित नक्कल फी घेऊन पुरविण्यात येते.
९) उप अधीक्षक भूमि अभिलेख यांनी नेमलेल्या चौकशी तारखेस सर्व सहधारक उपस्थित असल्यास अशा प्रकरणामध्ये अभिलेख दुरूस्तीची कार्यवाही ही परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर १ महात पुर्ण करावी लागते अपवादात्मक परिस्थितीत काही प्रकरणात नेमलेल्या तारखेस चौकशी काम न झाल्यास सदर प्रकरणी तात्काळ पुढील ७ दिवसात चौकशी तारीख नेमून कार्यवाही पूर्ण केली पाहिजे.
१०) अर्जदार यांनी मोजणी अर्ज सादर करताना सर्व सहधारकांची संमतीदर्शक स्वाक्षरी घेतलेल्या कच्चा नकाशासह संपुर्ण मोजणी प्रकरण ‘अ’ अभिलेख म्हणून जतन केले जातात.
११) उपरोक्त प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संबंधित धारक आवश्यकता वाटल्यास त्यांचे पोटहिश्याची हद्द कायम करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे नियमानुसार स्वतंत्र मोजणी अर्ज करू शकतात.
संमतीने पोटहिस्सा मोजणी करा, मनशांती मिळावा.
वाचलेल अवडले? मग हे ही अवडेल: निर्माणाधीन सदनिका घेऊ नका!